गडचिरोली : येथील हनुमान वॅार्डमधील तेली मोहल्ल्यातील रहिवासी असलेली चार मुले वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर पोहण्यासाठी गेली असताना पाण्यात बु़डू लागली. यावेळी नदीच्या काठावर असलेल्या त्यातील दोन मुलांच्या मातेने नदीपात्रात धाव घेऊन आपल्या दोन मुलांसह आणखी एका मुलाला वाचवले. पण या दुर्घटनेत एका बालकाला जलसमाधी मिळाली. ही घटना शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेत मृत्यू झालेल्या बालकाचे नाव जयंत आझाद शेख (10 वर्ष) असे असल्याचे समजते. या घटनेत रिजाय शब्बीर शेख (14 वर्ष), जिशान फय्याज शेख (15 वर्ष) आणि लड्डू फय्याज शेख (13 वर्ष) सर्व रा.तेली मोहल्ला यांना वाचवण्यात यश आले.
हे सर्व मित्र बोरमाळा घाटावर पोहण्यासाठी गेले होते. सोबत जिशान व लड्डू यांची आई ताजू शेख यासुद्धा होत्या. पाण्यात उतरलेल्या मुलांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ती बुडू लागली. ही बाब लक्षात येताच काठावर असलेल्या ताजू शेख यांनी तडक नदीपात्रात धाव घेत स्वत:च्या दोन मुलांना आणि शब्बीर याला वाचवले. पण सर्वात छोटा जयंत शेख पाण्यात बुडाला. यावेळी काही मच्छीमार बांधवही मदतीसाठी धावले. मात्र त्यापूर्वीच जयंत याचा मृत्यू झाला.
मृत मुलाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॅाक्टरांनी मृत घोषित केले. डॅाक्टरांनी पोलिसांना या घटनेची माहिती देऊन शवपरिक्षणाची तयारी सुरू केली. पण रुग्णालयात जमलेल्या नातेवाईकांनी शवपरिक्षणाला नकार देत त्या बालकाचा मृतदेह दुचाकीवरून घरी नेला. गडचिरोली पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.