गडचिरोली : महाशिवरात्रीनिमित्त आयोजित जिल्ह्यातील यात्रा उत्साहाने पार पडल्या. सर्वात मोठ्या 10 दिवस चाललेल्या मार्कंडा यात्रेत लाखो भाविकांनी हजेरी लावली. जिल्हाधिकारी गडचिरोली अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने योग्य व्यवस्थापन लावल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. विशेष म्हणजे नदीपात्रात बुडणाऱ्या चार युवकांना वाचवण्यात यश आले.
मार्कंडा (ता.चामोर्शी), चपराळा (ता.चामोर्शी) तसेच पळसगाव (ता.आरमोरी) येथे 15 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या यात्रांचा कालावधी 25 फेब्रुवारीपर्यंत होता. विशेषतः मार्कंडा येथील यात्रेदरम्यान वैनगंगा नदीपात्रात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी व्यापक उपाययोजना केल्या होत्या. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) नागपूर येथील 20 जवानांचे पथक, अग्निशमन विभाग, पोलीस विभागाचे बचाव पथक, बोट व आवश्यक बचाव साहित्य, तसेच आपदा-मित्र यांचे पथक यात्रा कालावधीत तैनात करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी यात्रापूर्व तयारीसंदर्भात वेळोवेळी बैठका घेऊन सर्व संबंधित विभागांना स्पष्ट दिशानिर्देश दिले होते. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद व इतर संबंधित विभागांनी समन्वयाने काम करत यात्रा सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.
आपत्ती व्यवस्थापनाच्या तत्परतेमुळे नदीपात्रातील संभाव्य जिवितहानी टाळण्यात यश आले. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी आपदा मित्र मनोज आत्राम व एसडीआरएफ जवान जी.डी. सांगळे यांनी नदीत बुडत असलेल्या एका युवकाचे प्राण वाचविले. तसेच दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी तीन युवक नदीपात्रात बुडाल्याची घटना घडताच आपदा मित्र समीर शेंडे, पोलीस बचाव पथकातील बाबा वासनिक व गोपाळ आलाम यांनी तात्काळ बोट व लाईफ जॅकेटच्या सहाय्याने नदीत उतरून तिन्ही युवकांना सुरक्षित बाहेर काढले. जिवितहानी टाळण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची व आपदा मित्रांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
सदर यात्रांचे आपत्ती व्यवस्थापन नियोजन चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एम.अरुण व गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक दीपक डोंब, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, सहायक महसूल अधिकारी (आपत्ती व्यवस्थापन) स्वप्नील माटे तसेच आपदा मित्र चंद्रशेखर मोलंगुलवार, अजित नरोटे, कल्पक चौधरी व मयुर किन्नाके यांच्या सहकार्याने यात्रेतील आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
































