यावर्षी पीक विमा काढला की नाही? त्वरा करा, आज शेवटची तारीख

कुठे आणि कसा संपर्क कराल, वाचा

गडचिरोली : राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक रुपयात पीक विमा योजना मागील वर्षीपासून अंमलात आणली आहे. या योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने विमा काढावा आणि योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टलवरील हेल्पलाईन 14447, संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मस्तोळी यांनी केले आहे.

पीक विम्याचे अर्ज भरताना काही कॉमन सर्व्हिस सेंटरचे (सीएससी) चालक हे विम्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रतीअर्ज एक रुपयापेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. एक रुपयापेक्षा अधिक रक्कम घेणाऱ्या सीएससी केंद्रांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी शासनामार्फत टोल फ्री क्रमांक 14599, 14447 तसेच 011-49754923, 011-49754924 आणि व्हाट्सअॅप क्रमांक 9082698142 तसेच इ-मेल आयडी support@csc.gov.in उपलब्ध आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा सीएससी प्रमुख यांच्याकडेही तक्रारी केल्यास त्याची दखल घेऊन कडक कारवाई केली जाणार आहे.

विमा योजनेमध्ये सहभागासाठी हे आहेत पर्याय

शेतकरी स्वतः केंद्र सरकारचे विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर ऑनलाईन अर्ज भरू शकतो. शेतकऱ्याचे ज्या बँकेमध्ये खाते आहे, त्या बँकेमध्ये जाऊन तो विमा अर्ज भरू शकतो. केंद्र सरकारने नियुक्त केलेले विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत सहभाग घेऊ शकतो. सीएससी केंद्र चालकामार्फत अर्ज करता येऊ शकतो. सीएससी केंद्र चालकांना प्रतिशेतकरी रुपये 40 प्रमाणे शुल्क केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. हे शुल्क संबंधित विमा कंपनी ही सीएससी यांना अदा करणार आहे. याच्या व्यतिरिक्त अन्य शुल्क सीएससी चालक घेऊ शकत नाहीत. मात्र शेतकऱ्याने 7/12, 8-अ स्वत: काढून दिला पाहिजे. किंवा शासकीय शुल्क भरून ऑनलाईन प्राप्त करून घ्यावा.

विमा योजनेत सहभागी होण्याकरिता काय करावे?

बिगर कर्जदार शेतकरी आपला 7/12 चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटरच्या मदतीने विमा योजनेत सहभाग घेऊ शकतात किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलची मदत घेऊ शकतात.