गडचिरोली : संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य करावे यासाठी शेतकरी कामगार पक्षासह डाव्या मित्रपक्षांनी वेळोवेळी आंदोलने केल्यानंतर राज्य शासनाने या योजनेतील अपंग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य सुरू केले आहे. मात्र इतर लाभार्थ्यांना ही वाढ लागू करण्यात आली नाही. या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना सरसकटपणे किमान अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाभरातील विविध तहसील कार्यालयांसमोर शेतकरी कामगार पक्ष आणि मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्ष या डाव्या मित्रपक्षांनी शुक्रवारी (दि.17) एक दिवसीय ठिय्या आंदोलन व निदर्शने केली.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, डॉ.गुरुदास ठेमस्कर, चंद्रकांत भोयर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अभिलाषा मांडवगडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली तहसील कार्यालयासमोर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठिय्या मांडून आंदोलन केले. यावेळी रामदास दाणे, किसन साखरे, महागू पिपरे, गजानन झाडे, एकनाथ मेश्राम तरकडू भोयर, मारोती मडावी, माणिकराव शिडाम, देवाजी गेडाम, भाऊजी गुरुनुले, महादेव नैताम, सोमाजी राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने निराधार लाभार्थी उपस्थित होते.
आरमोरी येथील तहसील कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, विठ्ठल प्रधान, राजू सातपुते, अशोक शामकुळे, रमेश मेश्राम, प्रमोद कोजेकर, अर्चना मारकवार, रंजना कुंभलकर , कविता मेश्राम यांनी केले. यावेळी आंदोलनस्थळी येऊन नायब तहसीलदार दोनाडकर यांनी निवेदन स्वीकारले.
शेकापच्या महिला नेत्या जयश्री जराते, युवक नेते अक्षय कोसनकर, आकाश आत्राम यांच्या नेतृत्वात एटापल्ली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. चामोर्शी येथे आंदोलनानंतर पवित्र दास, रामबाबा मडावी, दादाजी केस्तवाडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
















