
कुरखेडा : आतापर्यंत वाघ-बिबट्यांच्या घरात (जंगलात) माणसं जातात म्हणून त्यांच्यावर वन्यजीवांकडून हल्ले होतात असे म्हटले जात होते. पण आता जंगलात राहणाऱ्या बिबट्याने चक्क माणसांच्या घरात प्रवेश केल्याची घटना तालुक्यातील येळापूर या गावात घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हाणी न होता त्या बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात टाकण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले.
झाले असे की, काल संध्याकाळी येळापूर येथील सुखदेव कवडो यांच्या घराच्या आवारातील स्नानगृहात बिबट्या शिरला होता. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही बाब लक्षात आली. प्रसंगावधान राखत कवडो यांनी दार बंद करून इतरांना ही माहिती दिली. एव्हाना शेजारीपाजारीही गोळा झाले. दरम्यान वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक बी.आर.वरूण, सहायक वनसंरक्षक जोजिन जॅार्ज, रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात तातडीने परिसरातील सर्व वनपरिक्षेत्राच्या पथकांना येळापूरमध्ये पाचारण करण्यात आले. त्यांनी बिबट्या शिरलेल्या घराला घेरले आणि दोन तासांच्या मोहिमेनंतर यशस्वीपणे त्या बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात यश मिळवले. यामुळे सुखदेव कवडो यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
जेरबंद बिबट्याला आज लोकवस्तीपासून दूर असलेल्या जंगलात सोडण्यात येणार आहे. या मोहिमेत पुराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रविंद्र चौधरी, कुरखेडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड, पूराडा क्षेत्राचे सहायक नंदकुमार पोले, कुरखेडाचे क्षेत्र साहायक संजय कंकलवार, सोनसरीचे क्षेत्र सहायक अमोल राऊत आदींसह वनकर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
































