वाचनालये व प्रयोगशाळांतून आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ

आश्रमशाळांचा होतोय कायापालट

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीअंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन यांच्या संकल्पनेतून प्रकल्पातील सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक ग्रंथालये आणि विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी आणि विज्ञानाची गोडी लागण्यास मोठी मदत होणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

11 पैकी 7 शाळांमध्ये ग्रंथालये कार्यान्वित

‘विशेष केंद्रीय सहाय्य’ योजनेअंतर्गत अहेरी प्रकल्पातील सर्व 11 शासकीय आश्रमशाळांमध्ये ग्रंथालये उभारण्याची योजना मंजूर आहे. यातील सात आश्रमशाळांमध्ये ही ग्रंथालये प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित चार शाळांमध्ये देखील ही प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असून लवकरच तिथेही ही सुविधा उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही अतिरिक्त निधीची मागणी न करता, मागील काही वर्षांतील अखर्चित निधीचा मेळ घालून या सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे.

अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा आणि तंत्रज्ञान

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी ‘केंद्रवर्ती अर्थसंकल्प’ योजनेतून खमनचेरू आणि पेरमिली या विज्ञान शाखा असलेल्या शाळांमध्ये अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी ‘इंटरअॅक्टिव्ह अँड्रॉइड पॅनल्स’चा वापरही सुरू करण्यात आला आहे.

प्रयोगशाळा आणि वाचनालयाच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला गती मिळेल व स्वयंअध्ययनास प्रोत्साहन आणि स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीची सुवर्णसंधी यातून प्राप्त झाली असल्याचे मत यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी व्यक्त केले.