गडचिरोली : आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक निधी योजनेअंतर्गत पोर्ला येथे सुसज्ज वाचनालयाचे बांधकाम केले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. विधिवत पूजन करून आणि कुदळ मारून आ.डॅा.नरोटे यांनी भूमिपूजनाची औपचारिक सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थ, महिला मंडळ, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
या वाचनालयाच्या माध्यमातून गावातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक, तसेच वाचनाची आवड असलेले नागरिक यांना ज्ञानवृद्धीसाठी आणि अभ्यासासाठी एक उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहे. “ज्ञान हेच खरे बल” या भावनेतून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना प्रगतीचा नवा मार्ग दाखविणारा ठरणार आहे. या वाचनालयामुळे पोर्ला परिसरातील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध व प्रेरणादायी होईल. गावातील विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय केवळ एक सुविधा नसून त्यांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे केंद्र ठरणार आहे.
“गावांचा सर्वांगीण विकास फक्त रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा यापुरता मर्यादित नसतो. तो तेव्हाच घडतो, जेव्हा गावात ज्ञान, संस्कृती आणि श्रद्धेची ज्योत प्रज्वलित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपण आपल्या मुलांना शिकवतो, पण त्यांच्या गावातच जर दर्जेदार वाचनालय उपलब्ध झाले, तर तोच विद्यार्थी स्वतःचे आणि गावाचे भविष्य घडवू शकतो. म्हणून अशा प्रकल्पांची गरज आहे,” असे मार्गदर्शन यावेळी आ.डॅा.नरोटे यांनी केले.
याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, पोर्लाच्या सरपंच निवृत्ता राऊत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, अनिल म्हशाखेत्री, ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री रत्नदीप म्हशाखेत्री, भाजप तालुका महामंत्री लोमेश कोलते, उपसरपंच सुजित राऊत, ग्रा.स. मुरखडाच्या सदस्य दिप्ती कोरडे, गुरुदेव निमगडे, ग्रा.स.पोर्लाचे सदस्य अजय चापले, अनिल चापले, रवींद्र सेलोटे, अभिजित कोरडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            































