गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने एकूण ६१ ठिकाणी वाचनालय उभारण्याचे उद्दीष्ट ठेवत बुधवारी ५६ व्या वाचनालयाचे लोकार्पण कारवाफा येथे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृती जोपासली जावी आणि भविष्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करुन या वाचनालयातून चांगले अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेमधून दुर्गम भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळणार असून उत्कृष्ट खेळाडूंना प्रो-लीग संघांकडून खेळण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या सर्व पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्रातील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या शिक्षणासह बौद्धिक कला-गुणांना वाव मिळावा, त्यांच्या वैचारिक क्षमतेत वाढ होऊन विचारात बळ यावे आणि ते नक्षल विचारधारेकडे आकर्षित होवू नये, त्यांना जगातील घडामोडींची, शासकीय योजनांची माहिती मिळावी, तसेच वाचनातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परिक्षेची ओढ निर्माण व्हावी यासाठी गडचिरोली पोलिस दलाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत पोस्टे कारवाफा परिसरातील नागरिक आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी व श्रमदानातून कारवाफा येथे महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली. या वाचनालयाचे उद्घाटन बुधवारी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला कारवाफा क्षेत्रातील ४०० ते ५०० नागरीक उपस्थित होते.
सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच पोलिस स्टेशनपासून वाचनालयापर्यंत गावातील प्रमुख मार्गावरून पुस्तक दिंडी काढण्यात आली. यात शाळकरी विद्यार्थी, परिसरातील नागरीक सहभागी झाले होते. यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल, कारवाफाच्या सरपंच महानंदा आतला व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वाचनालयाचे उद्घाटन झाले. या वाचनालयामध्ये ग्रंथालय, अभ्यासिका, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याकरीता विद्यार्थ्याच्या बैठक व्यवस्थेकरीता टेबल, चेंजर व बुक ठेवण्याचे कपाट, तसेच इतर पायाभूत सुविधेसह ५०० हून अधिक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
यासोबतच जनजागरण मेळाव्यात उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना सायकल, नोटबुक, पेन्सिल, शार्पनर, तसेच नागरिकांना स्प्रे पंप, घुरविरहीत शेगडी, लोणचे-पापड किट, विविध प्रकारचे शासकीय प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी व्हॉलीबॉल सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.