गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या शिक्षणासह बौद्धिक विकासाला वाव मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत हेडरी पोलीस उपविभागातील वांगेतुरी येथे 73 व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते आणि वरिष्ठ अधिकारी व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत वांगेतुरी येथे सर्व सुविधांनी सुसज्ज अशा सार्वजनिक वाचनालयाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला. विशेष म्हणजे गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे अधिकारी व अंमलदार, तसेच वांगेतुरी परिसरातील नागरिकांच्या लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून या सुसज्ज व आधुनिक वाचनालयाची उभारणी करण्यात आली.
या लोकार्पण सोहळ्याची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. यात शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरीकांनी पारंपरिक वेशभूषा करून व पारंपरिक वाद्य वाजवून उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या वाचनालयामध्ये स्वतंत्र अभ्यासिका, बैठक व्यवस्थेकरीता टेबल, खुर्ची, पुस्तके ठेवण्याचे कपाट व इतर मुलभुत सुविधांसह सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, असिस्टंट कमांडण्ट सिआरपीएफ 191 बटालियन मनोज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी) योगेश रांजणकर, पोस्टे वांगेतुरीचे प्रभारी अधिकारी सपोनि दिलीप खडतरे, एसआरपीएफ ग्रुप 18, काटोल नागपूरचे पोउपनि. जनार्धन साबळे तसेच परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरीक उपस्थित होते.
205 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ
यापुर्वी स्थापन करण्यात आलेल्या 72 वाचनालयांचा लाभ अतिदुर्गम भागातील 8500 पेक्षा जास्त युवक-युवती व नागरिकांना होत आहे. या माध्यमातून 205 विद्यार्थी शासनाच्या विविध विभांगामध्ये भरती होण्यात यशस्वी झाले आहेत. गडचिरोली पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या प्रभावी नागरी कृती उपक्रमांमुळे मागील पाच वर्षात गडचिरोली जिल्ह्रातून माओवादी संघटनेमध्ये एकही तरुण-तरुणी भरती झालेले नाही.
































