गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलात शिपाईपदाच्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी देणाऱ्या उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी पोलिसांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांच्या माहीतीकरीता दररोज चाचणी देणाऱ्या उमेदवारांचे गुणांकन वेबसाईटवर टाकले जात होते. आता सर्व उमेदवारांना मिळालेल्या गुणांची एकत्रित यादी सुद्धा गडचिरोली पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या www.gadchirolipolice.gov.in यावर टाकण्यात आली आहे. तसेच पोलीस मुख्यालयाबाहेरील फलकावर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे.
गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार, शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमुद केलेल्या रिक्त जागांच्या 1:10 (एकास दहा) या प्रमाणात लेखी चाचणीकरीता पात्र राहणार आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांच्या गुणांकन यादीचे अवलोकन केल्यास कोण लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत हे स्पष्ट होणार आहे.
उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये, तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्षाच्या दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
































