गडचिरोली : हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. शासनाच्या धोरणानुसार या आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाकडून पुनर्वसनही केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून निरक्षर किंवा अर्धवट शिक्षण सोडलेल्या पूर्वाश्रमीच्या माओवाद्यांना पोलीस आणि प्रौढ शिक्षण विभागाकडून साक्षरतेचे धडे दिले जात आहे. रविवारी त्यांची पहिली चाचणी यशस्वीरित्या झाली. त्यात साक्षरतेचे धडे गिरवत असलेल्या 106 जणांपैकी 42 जणांनी सहभाग घेतला.
आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा सर्वंकष विकास होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी साक्षरता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पित माओवाद्यांना शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार मिळवून देऊन त्यांचा सर्वागीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनी तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (एम.एस.एस.डी.एस.) यांच्या अंतर्गत देण्यात येणाया कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता किमान शैक्षणिक अर्हता 5 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र बहुतेक लोक माओवादी चळवळीत जाण्यापूर्वी पाचवीपर्यंतचे शिक्षणसुद्धा पूर्ण करू शकलेले नाहीत. काही जण शालेय शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहिले होते. सदर बाब लक्षात घेऊन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जागतिक साक्षरता दिनापासून (8 सप्टेंबर 2025) ते 21 सप्टेंबर 2025 या कालावधीत घेतलेल्या साक्षरता वर्गात 106 आत्मसर्पित माओवाद्यांनी साक्षरतेचे धडे गिरवले.
सदर प्रशिक्षणामध्ये अक्षर ओळख, शब्दरचना, अंकगणित यासारख्या मूलभूत विषयांसोबत डिजीटल साक्षरतेचे धडे देखील देण्यात आले. यासोबतच आत्मसमर्पित माओवाद्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक विविध गोष्टींचे ज्ञान देखील देण्यात आले. त्यांची साक्षरता चाचणी रविवारी (दि.21) रोजी पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉलमध्ये घेण्यात आली. या चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर सदर आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना साक्षरता प्रमाणपत्र देण्यात येवून ते 5 व्या आणि 8 व्या वर्गाच्या परीक्षेकरिता पात्र होणार आहेत. 8 वी आणि 10 वीच्या परीक्षेकरिता पात्र माओवादी सदस्यांकरिता स्वतंत्र शिक्षण वर्गाचे देखिल आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गडचिरोलीचे शिक्षक, आत्मसमर्पण शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी परिश्रम घेतले.