अहेरी : जिल्ह्यातील अहेरी येथे भाग्यश्रीताई आत्राम फॅन्स क्लबच्या वतीने 22 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लॉयड्स व्हॉलीबॉल संघाने उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या विविध भागांतील संघांविरुद्ध झालेल्या चुरशीच्या सामन्यांनंतर लॉयड्स संघाने ही कामगिरी साध्य केली.
पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध भागांतील एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे स्पर्धेत चुरस निर्माण झाली होती. अंतिम सामन्यात नागपूर ऑरेंज सिटी संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद मिळवले. संपूर्ण स्पर्धेत सातत्य, शिस्त आणि उत्कृष्ट सांघिक समन्वय दाखवत लॉयड्स व्हॉलीबॉल संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि उपविजेता ठरला. या यशाबद्दल संघाला ₹55,000 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत चंद्रपूर, डब्ल्यूएसएफ वरोरा, चंद्रपूर सिटी, गोंडपिपरी, आम्रपाली, आलापल्ली तसेच राज्यातील इतर अनेक व्हॅालीबॅाल संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) च्या महिला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शाहीन हकीम, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. लॉयड्स व्हॉलीबॉल संघाचे हे यश लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. ही अकादमी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे.
प्रभाकरन यांनी लॉयड्स संघाचे अभिनंदन करत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. अकादमी स्थानिक खेळाडूंना प्रशिक्षण देऊन त्यांना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अकादमी समर्थित संघांनी जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
































