गडचिरोली : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध योजना उपलब्ध आहेत. यात लघुउद्योग सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांची बिनव्याजी कर्ज, तर 5 लाखापर्यंतचे कर्ज अवघ्या 4 टक्के दराने मिळणार आहे. या योजनेचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता (लघु उद्योग) 1 लाखाची बिनव्याजी थेट कर्ज योजना सुरु केली आहे. सदर योजनेत नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना द.सा.द.शे. 4 टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. यासाठी कर्ज परतफेडीची मुदत 4 वर्ष असणार आहे. 20 टक्के बिजभांडवल योजना 5 लाखापर्यंतच्या कर्जासाठी आहे. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतुक क्षेत्राशी संबधित व्यवसाय, तसेच पारंपरीक, लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नावीन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येते.
यात मंजुर कर्ज रकमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग राहणार आहे. महामंडळाच्या कर्ज रकमेवर 4 टक्के व्याज दर असून बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याज दर लागु राहणार आहे. कर्जाची परतफेड 5 वर्षात करायची आहे.
याशिवाय वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 10 लाखापर्यंत आहे. या योजनेचे स्वरुप बँकेने 10 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजुर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येणार आहे. सदर योजना संपुर्णपणे संगणकीकृत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार आहे. गट कर्ज व्याज परतावा योजना 10 ते 50 लाखापर्यंत आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग महामंडळाच्या निकषानुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवाराच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता कर्ज दिले जाणार आहे. त्या कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
इच्छुक उमेदवारांनी योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आय.टी.आय. मागे, गडचिरोली येथे संपर्क साधावा.