
देसाईगंज : तहसील कार्यालय देसाईगंजद्वारे आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या टप्पा क्र.1 ची सुरुवात 7 मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय शंकरपूर येथे झाली. या शिबिरात विविध विभागांच्या प्रलंबित कामांचा जलद निपटारा करण्यात आला.
दैनंदिन जीवनातील प्रशासकीय कामे सुकर व जलद करण्यासाठी शासन थेट नागरिकांच्या दारी पोहोचले आहे. प्रलंबित अर्जांचे निराकरण हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, यात लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी, घरकुल योजना, पट्टेवाटप, संजय गांधी निराधार मंजुरी, उत्पन्न प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, अॅग्री स्टॅक कार्ड, ई-शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, मनरेगा प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, सातबारा दुरुस्ती, आयुष्यमान कार्ड व वारस नोंद प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार कृष्णा गजबे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी भाषणात म्हटले, शासनाच्या या पुढाकारामुळे नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचतात. प्रत्येक नागरिकाच्या दारी सेवा पोहोचवण्याचा हा सकारात्मक प्रयत्न आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसेन्नजीत प्रधान, तहसीलदार प्रीती डूडुलकर, निरीक्षण अधिकारी सुरज बोरकर, तसेच रेखा बोके, नंदकिशोर कुंबरे, मुकेश शेलोकर, डॉ.आनंद दिखरे, दादाजी वाल्हे, गोपाल विके, उषा बुद्दे व सर्व विभागीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
































