226 ग्रामपंचायतींमध्ये लोकांनी स्वयंस्फुर्तीने केले महाश्रमदान

समृध्द पंचायत राज अभियान

श्रमदानातून उभारलेल्या बंधाऱ्यासोबत अधिकारी आणि गावकरी.

गडचिरोली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील 226 ग्रामपंचायतींमध्ये महाश्रमदानाचे आयोजन 20 नोव्हेंबरला केले होते. यात जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला.

या अभियानातून गावांचा सर्वांगीण विकास साधणे आणि त्याद्वारे ‘विकसित महाराष्ट्र 2047’ हे ध्येय गाठण्यासाठी पंचायत राज संस्थांना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण भागातील विकास कामांना गती देणे, स्वच्छता अभियान, सार्वजनिक ठिकाणी सुधारणा तसेच ग्रामस्थांमध्ये सहभागाची भावना वृद्धिंगत करणे हा या महाश्रमदान कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या उपक्रमात श्रमदानातून ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता, ग्राम स्वच्छता, नाल्यांची साफसफाई, गावातील सार्वजनिक विहिरींची स्वच्छता, वृक्षारोपण, सार्वजनिक ठिकाणांची दुरुस्ती, रस्ते तयार करणे तसेच वनराई बंधारा बांधकाम करणे, शाळा रंगरंगोटी करणे, वाचनालये तयारे करणे, व्यायमशाळा तयार करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश होता.

अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या नेतृत्वाखाली महाश्रमदान आयोजित करण्यात आले. यामध्ये नागरिक, स्वयंसेवक आणि अधिकारी एकत्र येऊन गावातील स्वच्छतेसाठी आणि सौंदर्यीकरणासाठी काम केले. यामध्ये जिल्ह्यातील 36 पांदण रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली. तसेच 112 वनराई बंधारे बांधण्यात आले. तसेच वृक्षारोपण, स्वच्छता अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सहभाग

या उपक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी पंचायत समिती धानोराअंतर्गत ग्रामपंचायत येरकड, सालेभट्टी, मुरूमगाव येथे भेट देऊन या उपक्रमात सहभाग घेतला. शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, प्रा.आ. केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, वाचनालयाला भेट देऊन पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजअंतर्गत विविध कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी सीईओ गाडे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी गडचिरोली पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायत दिभना, बाम्हणी येथे महाश्रमदानाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच जिल्हा परीषद गडचिरोलीचे खातेप्रमुख व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व कर्मचारी, तसेच ग्रामपंचायती कर्मचारी, सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक, बचत गटातील महिला, युवा मंडळे व शालेय विद्यार्थी यांनी या अभियानात सहभागी होऊन महाश्रमदान उपक्रम यशस्वीपणे राबविला.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 17 सप्टेंबर रोजी सुरू झाले असून ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. या उपक्रमातून गावांचा शाश्वत विकास साधण्यावर भर दिला जात आहे. ग्रामपंचायती आणि गावकरी मिळून या अभियानात सहभागी होत आहेत.