गडचिरोली : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ या शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानाचा एक भाग म्हणून गुरूवार, दि.20 नोव्हेंबर रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये महाश्रमदान हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांत विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आणि गावकरी आणि अधिकारीही सहभागी होणार आहेत.
य्रामीण भागातील विकास कामांना गती देणे, स्वच्छता अभियान, सार्वजनिक ठिकाणी सुधारणा, तसेच ग्रामस्थांमध्ये सहभागाची भावना वृद्धिंगत करणे हा या महाश्रमदान कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात श्रमदानातुन ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वच्छता, ग्राम स्वच्छता, नाल्यांची साफसफाई, गावातील सार्वजनिक विहिरींची स्वच्छता, वृक्षारोपण, सर्वजनिक ठिकाणांची दुरुस्ती, रस्ते तयार करणे तसेच वनराई बंधारा बांधकाम करणे, शाळांची रंगरंगोटी करणे, वाचनालये तयारे करणे, व्यायामशाळा तयार करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश असेल. त्या अनुषंगाने दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सर्व ग्रामपंचायत स्तरावर हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
































