गडचिरोली : जिल्ह्यातील नागरिकांना आंब्यांच्या विविध सुधारित आणि स्थानिक प्रजातींची माहिती देण्यासोबत आंब्यांचे महत्व, लागवडीचे तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करण्यासाठी बुधवार दि.22 रोजी गडचिरोलीत आंबा महोत्सवाचे आयोजन केले होते. चंद्रपूर मार्गावरील कृषी विज्ञान केंद्रात झालेल्या या प्रदर्शनात विविध प्रजातींच्या आंब्यांनी लक्ष वेधले.
सिरोंचा भागातून नावारूपाला आलेल्या आणि आकारमानाने सर्वसाधारण आंब्यापेक्षा मोठा असलेल्या कलेक्टर या आंब्यासोबत मधुर अशा मल्लिका, मंजिरी या वाणांनीही शेतकऱ्यांचे लक्ष वेधले. विविध प्रचलित वाणांसह काही स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातील वाणांचेही प्रदर्शन यात मांडले होते. त्यात प्रामुख्याने आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी तालुक्यातील कृष्णनगरच्या आंब्यांचा समावेश होते. आंबा लागवडीचे तंत्रज्ञान, उत्पादन याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॅा.संदीप कऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनात गेल्या पाच वर्षांपासून गडचिरोलीत या आंबा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून आंबा पिकाचे लागवड तंत्रज्ञान सुधारित पद्धतीने शेतकऱ्यांना सांगण्यासोबत विविध पदार्थांची निर्मिती यावरही मार्गदर्शन केले जात आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील आंबा पिकाचे उत्पादन क्षेत्र वाढावे हा उद्देश असल्याचे फलोत्पादन तज्ज्ञ एस.के.लकडे यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना सांगितले.