कोरची तालुक्यातील गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला

ठेंगण्या पुलांवर 4 ते 5 फूट पाणी

कोरची : पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद पडली आहे. यामुळे तालुक्यातील बहुतांश गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. छत्तीसगड राज्यात जाणारे आणि महाराष्ट्रात येणारे अनेक मालवाहू ट्रक, तसेच अनेक नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.

कोरची ते भीमपूर, गुटेकसा, कोचीणारा या मार्गावर असलेल्या अनेक नाल्यांवरील ठेंगण्या पुलांवरून चार ते पाच फुट पाणी वाहत असल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत हे मार्ग बंद होते. तसेच कोरची ते कुरखेडा राष्ट्रीय मार्गावरील सती नदी व समोरील काही नाल्यावरून पाणी वाहत असल्याने प्रमुख मार्गही बंद पडलेला आहे.

तालुक्यातील लहान पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे पोलीस प्रशासन व महसूल विभाग अलर्ट मोडवर आहे. भीमपूर, गुटेकसा, कोचीणारा मार्गावर पोलीस व कोतवालांना तैनात केले आहे. तुडुंब भरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून कोणी नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये यासाठी पोलिस सतर्क राहून पहारा देत आहेत.