गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड सीमावर्ती भागात वाढविलेल्या हालचाली आणि छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानातील आक्रमक कारवायांमुळे माओवाद्यांच्या गडाला सुरूंग लागला आहे. यामुळे ते चांगलेच धास्तावले आहेत. अशाच आक्रमक कारवाया सुरू राहिल्यास आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते, म्हणून नक्षलवाद्यांनी एका पत्रकाद्वारे शांतीवार्ता करण्याचा प्रस्ताव प्रशासनापुढे मांडला आहे. त्यात गडचिरोलीसह छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, मध्यप्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये कगारच्या नावाखाली केल्या जात असलेला ‘नरसंहार’ थांबवून युद्धविरामाची घोषणा करा, आम्ही चर्चेस तयार आहोत, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाकपाच्या (माओवादी) केंद्रिय समितीचा प्रवक्ता अभय याच्या नावे तेलगू भाषेत काढलेल्या या पत्रकात केंद्र आणि भाजपशासित राज्य सरकारवर आगपाखड करण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी जे आक्रमक अभियान सुरू केले आहे त्याचा ‘नरसंहार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या 15 महिन्यात विविध राज्यात 400 पेक्षा जास्त माओवादी आणि त्यांचे नेते तसेच सामान्य आदिवासी नागरिकही मारले गेल्याचे पत्रकात म्हटले आहे. मृत लोकांमध्ये एक तृतीयांश संख्या सामान्य आदिवासी लोकांची असल्याचा दावाही त्यात करण्यात आला आहे.
वास्तविक छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री विजय शर्मा यांनी आमचे सरकार माओवाद्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे, त्यांनी चर्चेसाठी समोर यावे, असे आवाहन केले होते. त्याचवेळी माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे माध्यम प्रतिनिधी विकल्प याने आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असा निरोप दोन वेळा दिला होता, असे पत्रकात म्हटले आहे.
सुरक्षा दलांमार्फत सुरू असलेले आक्रमक अभियान आणि गडचिरोलीत नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती थांबविल्यास आम्ही आताही चर्चेसाठी तयार आहोत, असे त्या नक्षल पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. आता त्यावर सरकार कडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

































