
गडचिरोली : भारतीय एकतेचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. नागरिकांमध्ये एकता, अखंडता आणि बंधुभावाची भावना दृढ करण्यासाठी तसेच संविधानात्मक मुल्यांचे जतन करण्यासाठी पोलीस स्मृती दिन व एकता दिनाचे औचित्य साधून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.31) गडचिरोली पोलीस दलाकडून रन फॅार युनिटी या मॅरेथॅानचे आयोजन केले होते. पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन व मदत केंद्रांमध्ये मॅरेथॉनसह निबंध स्पर्धा घेण्यात आली.

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सकाळी 6 वाजता पोलीस कवायत मैदान ते कारगिल चौकापर्यंत झालेल्या मॅरेथॉनचे उद्घाटन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी (गडचिरोली) सुरज जगताप यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार, जेष्ठ नागरिक, युवक/युवती आणि विद्यार्थ्यांनी मॅरेथॅानमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या मॅरेथॉनचा शहीद पांडू आलाम सभागृह येथे समारोप करण्यात आला. मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंनी एकात्मतेचा संदेश देणारे बॅनर, झेंडे आणि फलक हातात घेऊन उत्साहाने धाव घेतली. यावेळी पोलीस बँड पथकाच्या वतीने राष्ट्रभक्तीपर धून वाजवून स्पर्धकांचे मनोबल वाढविले.
सहभागी स्पर्धकांपैकी प्रथक, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या युवक-युवतींना पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या हस्ते रु.5000, रु.3000 व रु.2000 रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्रात आता सशक्त पिढी घडत आहे. ही पिढी गडचिरोली पोलीस दलाचा भाग होईल, अशी आशा यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे पोउपनि.चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार, तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.
































