गडचिरोली : पोलिस दलातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी तरुण युवक-युवतींना स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी निर्माण व्हावी, तसेच आदिवासी समाजाच्या विकास व सन्मानासाठी येणाऱ्या नवीन वर्षात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण गडचिरोली पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले. यावोळी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.
या मॅरेथॉन स्पर्धेत 3 किमी, 5 किमी, 10 किमी व 21 किमी अंतराचे टप्पे राहणार आहेत. वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळे अंतर ठेवले आहे. विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी सर्व धावपटूंना कीट, टी-शर्ट, बॅजेस, मेडल्स, प्रमाणपत्रे इ. देण्यात येणार आहे.
समाजाच्या सर्वच स्तरातून 13 ते 15 हजार नागरिकांचा यात सहभाग अपेक्षित असल्याचे पोलिस विभागाने सांगितले. गडचिरोली महामॅरेथॉन 2023 मध्ये १० हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेची तयारी सुरु असून अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश व उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर भुजबळ हे स्पर्धेंची संपूर्ण व्यवस्था पाहात आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी जवळच्या पोलिस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलिस मदत केंद्र येथे संपर्क साधावा, या मॅरेथॉन स्पर्धेची नोंदणी मोफत राहणार असून अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.