गडचिरोली : महाराष्ट्र पोलिसांच्या स्थापना दिनानिमित्त 2 ते 8 जानेवारीपर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा भाग म्हणून रेझिंग डे सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि.2) सकाळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलाने पथसंचलन केले. यात पोलिसांच्या विविध शाखांच्या पथकासह शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते.
शहरातील कारगील चौकापासून पथसंचलन सुरु होऊन इंदिरा गांधी चौक येथे सांगता करण्यात आली. वाहतुकीचे नियम व विविध विषयांचे फलक दर्शवून यावेळी जनजागृती करण्यात आली. पथसंचलनात ध्वजवाहक, पोलीस मुख्यालय महिला प्लाटून, विशेष अभियान पथकाचे प्लाटुन, बँड पथक, शालेय विद्यार्थी, श्वान पथक, बीडीडीएस पथक व एमपीव्ही वाहन यांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले.
शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा, महिला महाविद्यालय, राणी दुर्गावती हायस्कुल, गोंडवाना सैनिकी विद्यालय, शिवाजी हायस्कुल तसेच वसंत विद्यालय गडचिरोली अशा विविध शाळांमधील 350 विद्यार्थी- विद्यार्थींनीनी या पथसंचलनात सहभाग नोंदविला.
सप्ताहात राबविणार विविध उपक्रम
रेझिंड डे सप्ताहात गडचिरोली पोलीस दलाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी शस्र प्रदर्शन, गडचिरोली पोलीस दलाविषयी माहिती, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा याविषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती तसेच स्वच्छता अभियान व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.
































