गडचिरोली : भारतीय संस्कृतीनुसार नवीन वर्षाची सुरूवात असणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज विविध प्रकारच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होणार आहे. स्वस्त झालेल्या सोन्याच्या खरेदीसह गृहोपयोगी वस्तू, कपडे आणि वाहन खरेदीचाही योग साधल्या जाणार आहे. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला जिल्हाभरातील मार्केटमध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. विशेषत: दिड महिन्यापूर्वी सोन्याच्या किमतीने सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर आता सोन्याची किमती प्रतितोळा 30 हजार रुपयांनी कमी झाली आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

सध्या सोन्याचा दर प्रतितोळा 1 लाख 60 हजारांच्या आसपास आहे. हा दर सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर असला तरी कमी झालेल्या दराची संधी साधत श्रीमंतांपासून तर सर्वसामान्य घरातही आज सोन्याची खरेदी होण्याची शक्यता असल्याने सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

याशिवाय घरात लागणाऱ्या विविध वस्तू, लग्नसराईनिमित्त कपडे, आणि वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांनाही गुढीपाडव्याची प्रतीक्षा होती. अनेक जणांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची बुकिंग आधीच केली आहे. आता गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत नवीन वाहन घरी आणण्यासाठी ते उत्सुक आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही गुढीपाडव्याचे वेगळे महत्व आहे. ग्रामीण भागात गुढीपाडव्याच्या पर्वावर सालदार (वर्षभरासाठी गडी) निश्चित करण्याची पद्धत आता दिवसेंदिवस लोप लावत असली तरीही पुढील वर्षभरासाठी शेतीच्या कामाचे नियोजन या निमित्ताने केले जाते.



































