जंगलात बंदुक चालवणारी रजनी आता सन्मानाने संसाराचा गाडा चालविणार

वऱ्हाडी बनत पोलिसांनी लावले लग्न

गडचिरोली : नकळत्या वयात नक्षल चळवळीत जाऊन जंगलात भटकंती करणाऱ्या रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी (28 वर्ष) हिने भ्रमनिरास झाल्यानंतर गेल्यावर्षी 7 आॅक्टोबरला आत्मसमर्पण केले. तिला शासनाच्या योजनेप्रमाणे विविध लाभ देण्यासोबत आता तिचा जोडीदार मिळवून देत संसार उभा करण्यासाठीही पोलिसांनी पुढाकार घेतला. तब्बल 14 वर्षे जंगलात राहून बंदूक चालविणारी रजनी आता सुखाने आणि सन्मानाने आपल्या संसाराचा गाडा चालविणार आहे.

माओवाद्यांच्या विविध सशस्त्र दलममध्ये कार्यरत राहून एरीया कमिटी मेंबर पदापर्यत पोहोचलेली जहाल महिला माओवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी ही मूळची छत्तीसगडच्या भोपालपट्टनम जिल्ह्यातील रहिवासी आहे. पण गडचिरोली पोलीस दलामार्फत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी राबविल्या जाणा­ऱ्या योजना व सामाजिक उपक्रमांच्या प्रभावशाली अंमलबजावणीमुळे हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून मागील वर्षी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. रजनी हिच्यावर महाराष्ट्र व छत्तीसगड शासनाचे मिळून एकूण 11 लाख रुपयांचे इनाम होते.

दरम्यान रजनीला तिच्या आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठीही गडचिरोली पोलिसांनी पुढाकार घेतला. शेती करून सर्वसामान्य आयुष्य जगणारा कैलास मारा मडावी (26 वर्षे), रा.एलाराम, ता.अहेरी याने विवाहाला सहमती दर्शवली. रजनीलाही तो पसंत पडला. या दोघांनी परस्पर संमतीने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला गडचिरोली पोलीस दलाने पाठिंबा देऊन दि.16 रोजी शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदिरात पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह समारंभ पार पाडण्यात आला. यावेळी लग्न वऱ्हाडी म्हणून पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व अंमलदार प्रामुख्याने उपस्थित होते.

सदरचा विवाह समारंभासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसर्मपण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल व अंमलदार, विविध शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी सहकार्य केले.