अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त पेरमिली येथे माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली, तसेच गडी महाकाली मंडळाच्या नेतृत्वात सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात दुर्गम व अतिदुर्गम नक्षलग्रस्त गावातील गोरगरीब आदिवासी युवक-युवतींसह इतर समाजातील मिळून एकूण १११ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर पार पडला. या निमित्ताने गावभर भोजन झाले. गडी महाकाली मंडळाचे सदस्य प्रशांत ढोंगे यांच्या नियोजनात या भागातील हा पहिलाच सामूहिक विवाह सोहळा होता. अम्ब्रिशराव आत्राम यांनी या सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने १११ वधूंच्या पालकत्वाची जबाबदारी निभावली.
पेरमिलीच्या भव्य प्रांगणात सायंकाळी सुसज्ज व नेटक्या स्वरूपात हा विवाह सोहळा झाला. यावेळी गोंडी, माडिया व बौद्ध वधू-वरांचाही त्यांच्या पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्यात आला. या जोडप्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी गावातील सरपंच किरण नैताम पेरमिली, पंचायत समिती सदस्य प्रशांत ढोंगे, माजी पंचायत समिती सभापती बोडाजी गावडे, बापू सडमेक, मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी, माजी जिल्हा परिषद सदस्य रामरेड्डी बड्डमवार, पल्लेचे सरपंच राजू आत्राम, उपसरपंच सुनील सोयाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
विवाह सोहळ्यापूर्वी सकाळपासून पेरमिलीच्या प्रांगणात ‘लगीनघाई’ दिसत होती. सकाळनंतर भोजनावळी सुरू झाल्या. सायंकाळपर्यंत हजारोच्या संख्येत वऱ्हाडी मंडळींनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी अम्ब्रिशराव आत्राम यांच्यातर्फे नववधु-वरास आहेर,भांडी, सोन्याचे मंगळसूत्र भेट म्हणून देण्यात आले. वधू-वरांची ढोलताशाच्या गजरात सामूहिक वरात काढण्यात आली. अम्ब्रिशराव महाराज यांनी सर्व वधूंचे कन्यादान केले.