गडचिरोली : जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मार्कंडा मंदिराच्या संवर्धन प्रक्रियेस गती देण्यासह जिल्ह्यातील अन्य 6 राष्ट्रीय संरक्षित पुरातत्त्व स्थळांच्या पर्यटन विकासासंदर्भात नागपूर येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यांनी संबंधित कामे नियमानुसार आणि प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्ह्यातील इतर सहा राष्ट्रीय संरक्षित पुरातत्त्व स्थळांच्या विकासावरही चर्चा झाली. त्यात अर्सोडा येथील स्टोन सर्कल, ठाणेगाव येथील प्राचीन मंदिर, वैरागड येथील भंडारेश्वर मंदिर, वैरागड किल्ला, आरमोरीतील प्राचीन मंदिर व चामोर्शी येथील वीस क्रॉमलेक्स (किस्टव्हेन्स) समूह या स्थळांचा समावेश होता.
पुरातत्त्व विभागाचे विदर्भ प्रमुख अधीक्षण पुरातत्त्वविद् डॉ.अरुण मलिक यांनी मार्कंडा मंदिराच्या संवर्धन प्रक्रियेत तांत्रिक जटिलतेची प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि बारकाईने करणे आवश्यक असल्याचे व या संदर्भातील सर्व मोजमापे, गणिती आढाव्याची कामे अभ्यासपूर्ण पद्धतीने पार पाडण्यात येणार असल्याचे सांगितले.
बैठकीला पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक अधीक्षण पुरातत्त्वविद् डॉ.शिल्पा जामगडे, सहाय्यक अधीक्षण पुरातत्त्वीय अभियंते मिलिंद अंगाईतकर व नीरज तिवारी, वरिष्ठ संरक्षण सहाय्यक शुभम कोरे, सारंगधरन आणि शिवानी शर्मा हे अधिकारी उपस्थित होते.