गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात असलेल्या चातगाव-कुडकवाही येथील सर्च या संस्थेच्या ताब्यातील जमिनीची चौकशी करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व्हे क्र.94, 95 कुडकवाही येथील जमिनीची लिज रद्द करून ती जमीन भूमिहीन लोकांना द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र ट्रायबल्स अँड बॅकवर्ड पिपल अॅक्शन कमिटीचे डॅा.प्रमोद साळवे, चातगावचे माजी सरपंच नारायण विस्तारी सयाम आणि अनिल मेश्राम यांनी केली आहे. (सविस्तर बातमी खाली वाचा)

निवेदनात नमुद केल्यानुसार, मौजा कुडकवाही-चातगाव येथे सर्च संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या कालावधीत पूर्वी वनविभाग, आदिवासी आणि गोरगरीबांची असलेली 60 ते 70 एकर जमीन आज संस्थेच्या नावाने सात-बारावर नोंदणीकृत आहे. त्या क्षेत्रात गैरआदिवासींची वर्ग 1 ची जमीन गेल्या 100 वर्षाचा रेकॅार्ड बघितला असता उपलब्ध नाही. मग सर्च संस्थेच्या नावाने 39 एकर जमीन रेकॅार्डवर कशी? यातील जमीन विकत घेतली काय? असे प्रश्न डॅा.साळवे यांनी उपस्थित केले आहेत.
वास्तविक आदिवासींची जमीन, वनविभागाची जमीन, पट्ट्याची जमीन विकत घेता येत नाही. मग ही जमीन सर्चच्या नावाने झाली कशी? यातील सर्व्हे क्र.11 कुडकवाहीला सलग 27 एकरचा पट्टा (10.60 हे.आर.) एवढी जमीन सर्चच्या नावाने आहे. वास्तविक सरकारी नियमानुसार विकण्यायोग्य, घेण्यायोग्य जमीन नसताना हा सलग 27 एकरचा जमिनीचा पट्टा (सर्व्हे क्र.11) हा सर्चच्या नावाने झाला कसा? हे फार मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप डॅा.साळवे यांनी केला आहे.
या प्रकाराच्या मुळाशी जाऊन सखोल तपासणी करून सातबारा उतारा, रिनेबरिंग पर्चा, अधिकार अभिलेख, फेरफार पंजी, खरेदी-विक्रीपत्र हे शासनाने दिलेले असल्यास शासन निर्णय पी-1, पी-9 उतारा ही सर्व कागदपत्रे बघून सखोल चौकशी करावी आणि जमीन घोटाळा असल्यास गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॅा.साळवे यांनी केली आहे.
संस्थेकडे एवढी जमीन असताना पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेला सर्व्हे 94, 95 कुडकवाही मधील जवळपास 10 एकर जमीन झाडे लावण्यासाठी, तलावासाठी दिली. त्यामुळे ती लिज रद्द करावी अशी मागणी या संस्थेने निवेदनातून केली आहे. या निवेदनाची प्रत त्यांनी मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि इतर संबंधितांना पाठवली आहे.