युवक व महिलांच्या रोजगारासाठी मुंबईच्या ‘मिआम’ ट्रस्टचा पुढाकार

वडलापेठमध्ये सुरू केले प्रशिक्षण

अहेरी : जिल्ह्याच्या अहेरी क्षेत्रातील आदिवासी महिला आणि युवक वर्गाला रोजगाराभिमुख वातावरण तयार करण्यासाठी त्यांना शिक्षित करण्यासोबत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुंबईच्या मिआम चॅरिटेबल ट्रस्टने त्यासाठी पुढाकार घेत वडलापेठ या गावात त्याची सुरूवात केली असल्याची माहिती ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष नितू जोशी यांनी दिली.

वडलापेठ येथे या मिआम ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनाच्या उद्घाटनासाठी आल्या असताना त्या माध्यमांशी बोलत होत्या. जोशी म्हणाल्या, गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम असला तरी येथील लोकं व विद्यार्थी अतिशय मेहनती, हुशार व बलाढ्य आहेत. हीच बाब लक्षात घेता आम्ही मिआम चॅरिटेबल ट्रस्ट व ‘सुरजागड इस्पात’च्या माध्यमातून येथील विद्यार्ध्यांना बळ देण्याचे ठरवले आहे.

या भागातील विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळावं व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी केंद्रस्तरीय 3 दिवसीय क्रीडा महोत्सव ठेवला आहे. त्याअनुषंगाने मिआम वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. ज्यात शिक्षण, क्रीडा आणि रोजगार या अतिशय महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले जात आहे. या महोत्सवामध्ये अनेक खेळ समाविष्ठ करण्यात आले आहेत. त्यात खोखो, कब्बडी, रिले यासह इतर खेळांचा समावेश असून त्यातील गुणवंत विध्यार्थ्यांना पुढील भविष्याच्या प्रवासात लागणारी मदत सुद्धा मिआम करणार असल्याचे नितू जोशी म्हणाल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहेरीचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र चिटकुले, खमनचेरुचे सरपंच सायलू मडावी, महागाव (खु)च्या सरपंच रेणुका आत्राम, वांगेपल्लीचे सरपंच दिलीप मडावी, महागावचे उपसरपंच संजय अलोने, चुटुगुंटाचे उपसरपंच सुरेश आत्राम, रामपूर रै चे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिवाकर चटारे, चिंतलपेठचे पोलीस पाटील निरंजन दुर्गे, जामगावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वेंकटेश धानोरकर,जामगावचे पोलीस पाटील अरविंद निखाडे, चिंतलपेठचे भीमराव दुर्गे तथा परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, केंद्र प्रमुख, पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक तसेच खेळाडू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन केंद्रातील 25 शाळांचा सहभाग

दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालक्रीडा व कला संमेलनाचे आयोजन केले जाते. त्याअनुषंगाने अहेरी तालुक्यातील बोरी आणि महागाव या दोन्ही केंद्रांचे संमेलन वडलापेठ येथे घेण्यात येत आहे. सदर बाल क्रीडा व कला संमेलनात महागाव केंद्रातील 11 आणि बोरी केंद्रातील 14 अशा एकूण 25 शाळेतील तब्बल 900 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोरीचे केंद्र प्रमुख राजू आत्राम, सूत्रसंचालन शिक्षिका शैलजा गोरेकर तर आभार शिक्षक दिगांबर दुर्गे यांनी मानले.