अतिवृष्टीत प्रशासनाने सतर्क राहावे, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची सूचना

गडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस असल्याने गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावे आणि सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे.

पूर परिस्थिती असल्याने पूर्वनियोजित म्हणून नागरिकांना अन्नधान्य, औषधी, दैनंदिन साहित्य सामुग्री उपलब्ध करून ठेवावी. प्रसंगी राहण्यासाठी निवासस्थाने व ठिकाण उपलब्ध करून द्यावेत. जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था ठेवावी, अशाही सूचना ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अलर्ट असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी व खबरदारी घ्यावी, रस्ता व पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही दुचाकी, चारचाकी वाहने चालवू नये. नदीकाठावरील नागरिकांनी व गावकऱ्यांनी सतर्कता बाळगून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, प्रामुख्याने शेतकरी बांधवांनी शेतातील कामे व विजेशी संबंधित कामे काळजीपूर्वक करावी, पाणी उकळून प्यावे, थंड अन्न खाऊ नये, सर्वांनी सतर्क राहण्याचे व दक्षता बाळगण्याचे आवाहन ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. तसेच योग्य ती खबरदारी घेऊन सतर्क राहण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्याची माहिती मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. नागरिकांनी सुध्दा सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.