गडचिरोली : भारत हा विविध धर्म, भाषा व संस्कृतींचा देश असून विविधतेत एकता हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. भारतीय राज्यघटनेने अल्पसंख्याकांना समान अधिकार दिले असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले.
जिल्हा नियोजन कार्यालय व अल्पसंख्याक विभागाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ‘अल्पसंख्याक हक्क दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) स्वप्नील इज्जपवार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.एस. पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी सूत्रसंचालन करताना मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शिख, पारशी व जैन या अल्पसंख्याक समुदायांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पुस्तक भेट देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा नियोजन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन श्रीराम पाचखेडे यांनी केले. यावेळी विविध अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
































