देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील चोप-शंकरपूर मार्गांवर झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका इसमाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला, तर दुसऱ्या जखमी युवकावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे अपघातानंतर काही वेळात तेथून जात असलेल्या आ.कृष्णा गजबे यांनी संवेदनशिलतेचा परिचय देत जखमी युवकाला आपल्या वाहनातून देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेऊन दाखल केले.
चोप-शंकरपूर मार्गावरील चोपजवळ झालेल्या दुचाकीस्वाराच्या अपघातात चोप येथील शेळ्या राखत असलेल्या श्यामराव पर्वते यांना दुचाकीची धडक बसून ते गंभीर जखमी होऊन रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला, तर स्वप्निल लांजेवार हा युवक गंभीर जखमी होऊन तिथेच पडून होता. आमदार कृष्णा गजबे हे कोरेगांव येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शिबिराला उपस्थित राहून कोरेगांव-आरमोरीकडे रविवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान निघाले होते. यादरम्यान चोप-शंकरपूर मार्गावर त्यांना अपघाताचे दृष्य दिसले. गंभीर जखमी श्यामराव पर्वते यांना आधीच कोणीतरी रुग्णालयात हलविले होते, पण स्वप्निल लांजेवार हा युवक रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. हे पाहून आमदार गजबे यांनी आपली गाडी थांबवली आणि विचारपूस केली असता ते चोपचे रहिवाशी असल्याचे समजले. अपघातस्थळी ॲम्बुलन्स यायला खूप उशीर असल्यामुळे गजबे यांनी स्वतःच्या वाहनात गंभीर जखमी असलेल्या स्वप्निल लांजेवार या युवकाला देसाईगंजला नेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केला.
अपघात झाला की सामान्य माणूस पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून सहसा अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत. पण व्यस्त दिनक्रमातूनही आ.कृष्णा गजबे यांनी संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे.