देसाईगंज : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला आपल्या स्वगृही विराजमान झाल्याचा आनंद साजरा करत दि.२२ जानेवारीला पोटगाव येथे मोठ्या उत्साहात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत प्रभू श्रीरामासह, लक्ष्मण, रामभक्त हनुमान, जांबुवंत यांची वेशभुषा करत सहभागी झालेल्या युवकांनी लक्ष वेधून घेतले.

या शोभायात्रेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनीही सहभागी होऊन सर्वांना अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पर्वावरील आनंदोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या शोभायात्रेमुळे पोटगाव हे श्रीराममय झाले होते. याप्रसंगी ग्रामस्थांसह मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते. महिलाही डोक्यावर कलश घेऊन मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
































