५६० आदिवासी गावांमध्ये आरोग्य सेवेसाठी मिळाले १३ मोबाईल मेडिकल युनिट

खा.अशोक नेते यांच्या हस्ते लोकार्पण

गडचिरोली : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) या अभियानाव्दारे आरोग्य आणि पोषण यासारख्या मुलभूत सुविधा देण्यासाठी ९ तालुक्यांमध्ये १३ मोबाईल मेडिकल युनिटची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या आवारात खा.अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

पीएम जनमन अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गडचिरोली जिल्ह्यातील आदीम जमाती समुहाच्या सामाजिक आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मोबाईल मेडिकल युनिट तैनात करुन एएनएमव्दारे सेवा देणे व आयुष्यमान कार्ड उपलब्ध करुन देणे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गंत गडचिरोली जिल्ह्यातील ५६० आदिवासी गावांमध्ये १३ मोबाईल मेडिकल युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा, धानोरा, कोरची या तालुक्यांमध्ये मोबाईल मेडिकल युनिटमार्फत आयुष्यमान कार्ड, सिकलसेल तपासणी, क्षयरोग तपासणी, साथीच्या आजारांची तपासणी, मलेरिया, लसीकरण, कुष्ठरोग, राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि १८ प्रकारची औषधी व १२ प्रकारची प्रयोगशाळा तपासणी मोफत होणार आहे.

सदर मोबाईल मेडिकल युनिटमध्ये वैद्यकिय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, स्टाफ नर्स, वाहन चालक इत्याादी कर्मचारी उपलब्ध राहणार आहेत.

मेडिकल युनिटच्या लोकार्पण सोहळ्याला खा.अशोक नेते, आ. डॉ.देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) राजेंद्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.प्रफुल्ल हुलके, साथरोग अधिकारी डॉ.विनोद मशाखेत्री, डॉ.पंकज हेमके, डॉ.रुपेश पेदाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळवे, तसेच नागेश ताटलावार, रचना फुलझेले व मोबाईल मेडिकल युनिट (सर्च, धानोरा ) आणि गडचिरोलीचे पथक उपस्थित होते.