अखेर निरोपाचा मुहूर्त ठरला, 8 ऑक्टोबरला मान्सून जाणार

7 पर्यंत पिकांची काळजी घ्या

गडचिरोली : यावर्षी गडचिरोलीसोबत राज्याच्या अनेक भागात कहर केलेल्या पावसाने सर्वजण त्रस्त असताना दिलासा देणारी बातमी आली आहे. येत्या 8 ऑक्टोबरला मान्सूर निघून जाणार असल्याचे वृत्त हवामान विभागाने दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचा जीव भांड्यात पडणार आहे.

29 सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र 2 ते 7 ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान प्रामुख्याने मेघ गर्जनेसह दुपारनंतर पाऊस कोसळेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील.

काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 7 ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.