गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम-अतिदुर्गम भागातील विद्यार्थी, बेरोजगार युवा वर्गाला स्पर्धा परीक्षेसंदर्भात योग्य मार्गदर्शन आणि संधीचा मिळण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून ‘प्रोजेक्ट उडान’अंतर्गत दहाव्या स्पर्धा परीक्षेच्या सराव पेपरचे आयोजन केले होते. यात 3800 पेक्षा जास्त युवांनी एकाचवेळी विविध ठिकाणी पेपर सोडविला.

पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आणि यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या वतीने हा सराव पेपर घेण्यात आला. गडचिरोली पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृहात, तसेच एक गाव एक वाचनालयांतर्गत जिल्ह्यातील विवि पोस्टे/ उपपोस्टे/ पोलीस मदत केंद्रात उभारण्यात आलेल्या 73 वाचनालयांमध्ये हा स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर नि:शुल्क सोडविण्याची संधी देण्यात आली.
या सराव पेपरचा उपयोग विद्यार्थ्यांना येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेकरिता होणार आहे. दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विशेष बाब म्हणजे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र, पेनगुंडा हद्दीतील 15, पोलीस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील 10 विद्यार्थ्यांनी या सराव पेपरमध्ये सहभाग घेतला. तसेच ‘एक गाव एक वाचनालय’ उपक्रमांतर्गत दि.25 ऑक्टोबर 2025 रोजी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, वांगेतुरी येथे घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत 14 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
अनेक ठिकाणी सार्वजनिक वाचनालय, तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. पोलीस मुख्यालय परिसरात घेण्यात आलेल्या सराव पेपरमध्ये 2050 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांचे मनोबल वाढविले.
या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्यसाई कार्तिक, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि.चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.
































