गडचिरोली : आयुष्यात कोणतीही गोष्ट सकारात्मक किंवा नकारात्मक नसते. ते सगळे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. नकारात्मकतेला सकारात्मक करता येते. जीवनात पुढे जायचे असेल तर परिस्थिती बदलावी लागेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि युनिसेफचे शिक्षण सल्लागार राजीव तांबे यांनी केले.
अजब गजब विचार मंच, विदर्भ साहित्य संघ, पणती महिला संघटन, आदर्श शारदा महिला मंडळ, स्पंदन फाऊंडेशन, स्वामी विवेकानंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी, तर सायंकाळी पालकांसाठी स्थानिक सुमानंद सभागृहात या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते राजीव तांबे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्कूल आॅफ स्कॅालर्सचे प्राचार्य लांडगे, सतीश चिचघरे, अजब-गजब विचार मंचाचे सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना राजीव तांबे म्हणाले, जीवनात चूक लक्षात ठेवू नका. पण त्या चुकीपासून काय शिकलो हे लक्षात ठेवा. चूक म्हणजे वेगळा विचार होय. त्यामुळे टेन्शन नका घेऊ. आपण चूक पुन्हा पुन्हा आठवत राहतो म्हणून गडबड होते. जी गोष्ट सोपी वाटते तीच अत्यंत कठीण असते, पण अशक्य नसते. एखादी गोष्ट सोपी वाटते तेव्हा आपला अहंकार वाढलेला असतो असे समजा. आयुष्यात यश मिळवायचे असेल तर जोखीम पत्करावी लागते. तुमच्या लिखाणात, बोलण्यात आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही, असेही ते म्हणाले.
राजीव तांबे यांनी विविध रंजक कथा, किस्से सांगत हसत-खेळत विद्यार्थ्यांचे मनोरंजक पद्धतीने प्रबोधन केले. त्यांना अभ्यास व परीक्षेतील यशासाठी महत्त्वाचे कानमंत्र दिले. कार्यक्रमाचे संचालन सविता गोविंदवार यांनी केले.
सायंकाळी पालकांची शाळा
सायंकाळच्या सत्रात राजीव तांबे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. आपले पाल्य आपल्याकडूनच शिकत असतात. त्यांचे पहिले शिक्षक आपणच असतो. त्यामुळे आपली वागणूक योग्य ठेवली तर पाल्यांवरही चांगले संस्कार होतात. आपल्या पाल्यांना सतत टोकणे, घालून पाडून बोलणे किंवा इतरांच्या पाल्यांशी त्यांची तुलना करत राहणे यातून उपायापेक्षा अपायच अधिक होतो. आपल्या मुला-मुलींच्या आवडी-निवडी जाणून त्यानुसार त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांना आपल्या परीने फुलू देणे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलाने अमुक-तमुक व्हावे म्हणून आपले निर्णय त्यांच्यावर लादू नका. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करू नका, त्यांचा आत्मविश्वास डळमळू देऊ नका, असेही ते म्हणाले.
































