गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांतर्गत युवकांचा उच्च शिक्षणातील नोंदणी दर वृद्विंगत करण्यासह त्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रदान करण्यासाठी आता गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्विसेससोबत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगारक्षम प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्यासाठी सामंजस्य करार केला.
सदर कराराअंतर्गत तीन महिने कालावधीचे 35 पेक्षा अधिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सवलतीच्या शुल्कासह चालविण्यात येणार आहेत. यासंदर्भात स्वाक्षरी समारोहाकरीता टाटा कन्सलटन्सी सर्विसेसतर्फे महाव्यवस्थापक अभ्यीन पांडे, पुणे तसेच गोंडवाना विद्यापीठातर्फे कुलगुरू डॉ.प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, डॉ.मनिष उत्तरवार, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्याम खंडारे, डॉ.धनराज पाटील, वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे, विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे मुख्य कार्यक्रम अधिकारी आशिष घरई इत्यादी उपस्थित होते.
याअनुषंगाने विद्यापीठ परिक्षेत्रातील स्थानिक विद्यार्थ्यांनी सदर अभ्यासक्रमाकरीता प्रवेश निश्चित करण्याकरीता विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार क्षमता विकसित करावी, असे आवाहन डॉ.मनिष उत्तरवार यांनी केले.