गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विकासाच्या अपार संधी असून हा जिल्हा गुंतवणुकीचा केंद्रबिंदू बनला आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार आदी खात्यांचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी केले. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडलेल्या जिल्हा गुंतवणूक परिषद-2025 मध्ये ते दुरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॅान्फरन्सिंग) बोलत होते. या परिषदेत 66 कंपन्यांनी 493.41 कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoUs) केले. त्यातून अंदाजे 2100 लोकांना रोजगार मिळणार आहे.
यावेळी राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले की, मोठ्या उद्योगांपासून ते सूक्ष्म व लघुउद्योगांपर्यंतची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये वेगाने वाढत आहे. शासनाच्या विविध धोरणांतर्गत उद्योगांसाठी येथे आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यात येत असून, गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार केले जात आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर व उद्योग अनुकूल धोरणांमुळे गडचिरोलीला औद्योगिक नकाशावर उभे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांनी स्थानिक रोजगार निर्मितीच्या दृष्टीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
लॅायड्सचे निवासी संचालक विक्रम मेहता यांनी गडचिरोलीमध्ये औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षणासाठी स्वतंत्र तंत्रनिकेतन सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड यांनी उद्योग धोरणांतर्गत प्राप्त होणाऱ्या सवलती, करप्रणालीतील लाभ व सरकारी सुलभता केंद्राबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली.
या परिषदेच्या माध्यमातून उद्योजक, महिला बचत गट, एफपीओ, शासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी एकत्र आले. परिषदेत इतर मान्यवरांनीही आपली मते व्यक्त केली. प्रा.मनीष उत्तरवार, डॉ.श्रीकांत गोडबोले, प्रीती हिरळकर, उमेश पाटील, सुजित अकोटकर, प्रशांत ढोंगळे आणि नारायण पवनीकर यांनी परिषदेत स्टील क्षेत्रातील सहायक उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग, कर्ज व्यवस्थापन, निर्यात धोरण व ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ प्रणालीसंदर्भात विविध विषयांवर मनोगत व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.