नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करा, खा.डॉ.किरसान यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

आ.गजबे यांचीही सर्व्हेक्षणाची मागणी

गडचिरोली : गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द प्रकल्पातून सूरु असलेल्या पाण्याच्या विसर्गाने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली जिल्हा, आमगाव, ब्रह्मपुरी आणि चिमूर विधानसभा क्षेत्रातील बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहून गेले. गावात आणि शहरात पाणी शिरल्याने घरांचे आणि अन्यधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा सर्व नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून गरजूंना आर्थिक व आवश्यक ती मदत करण्यात यावी, अशी सूचना गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.नामदेव किरसान यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया यांना पत्र लिहून केली आहे.

नुकसानीचा अहवाल सादर करा

आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जुलै 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे लवकर सर्व्हेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची सूचना जिल्हाधिकारी तसेच तालुका प्रशासनाला केली.

विशेष म्हणजे वडसा-आरमोरी-गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम सुरू असून त्यासाठी मातीची मोठी पाळ टाकण्यात आली आहे.त्यामुळे रेल्वेमार्गाच्या परिसरात शेतामधून पाण्याचा निचरा होत नसल्याने धानपीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा. या कार्यवाहीबाबत मलाही अवगत करून सहकार्य करावे,असे पत्र आ.गजबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.