चामोर्शी : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिकअंतर्गत प्रादेशिक कार्यालय गडचिरोली व उप-प्रादेशिक कार्यालय (घोट) यांच्या संयुक्त विद्यमाने रेगडी (घोट) येथे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2025-26 साठी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले. माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात धान मोजमाप काट्याचे पूजन व फित कापून करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना डॉ.नेते म्हणाले की, “रेगडी (घोट) परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा व त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा, याच उद्देशाने हे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला धान विक्रीसाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावामुळे मध्यस्थांची साखळी मोडीत निघून शेतकऱ्यांच्या हातात थेट मोबदला मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊनच या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनी या केंद्राचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदैव शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. शेतकऱ्यांना बोनस देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला, ही बाब कधीही विसरता कामा नये, असेही डॅा.नेते म्हणाले.
या उद्घाटन सोहळ्याला प्रामुख्याने महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, नगरसेवक आशिष पिपरे, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबारे, उपप्रादेशिक व्यवस्थापक भगत, भाजपाचे
ज्येष्ठ नेते मनमोहन बंडावार, रेगडीच्या सरपंच सुरेखा गेडाम, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, धान खरेदी केंद्राचे उपनिरीक्षक पेंदाम, केंद्र प्रमुख लाटकरी, सी.पी. हलदार, विविध सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष तलांडे, माजी सरपंच बाजीराव गावडे, भाऊजी नेवारे, मुरारी नरोटे यांच्यासह आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, तसेच रेगडी परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी केंद्रस्थानी असलेला उपक्रम
धान खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे रेगडी व परिसरातील आदिवासी व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय हमीभावाचा थेट लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
































