गडचिरोली : शहरातील वर्दळीच्या इंदिरा गांधी चौकापासून तर धानोरा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा छोट्या व्यावसायिकांनी थाटलेली दुकाने हटविण्यात आली. सकाळपासून रात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती. अतिक्रमणधारकांना यापूर्वीच नगर परिषदेने अतिक्रमण काढण्याची सूचना दिली होती. पण व्यावसायिकांनी त्यासाठी पुढाकार न घेतल्याने नगर परिषदेने ही कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान शेतकरी कामगार पक्षाने या कारवाईला विरोध करत आधी त्या व्यावसायिकांच्या रोजगाराची सोय करावी, अन्यथा आमदारांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
रस्त्याच्या कडेला अस्थायी व्यवसाय थाटणाऱ्यांचे अतिक्रमण हटविल्याने त्या कुटूंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांच्या टपऱ्या हटविण्यात आल्या, त्यांना व्यवसायासाठी तातडीने पर्यायी सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शेकापने केली आहे.
जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मोठ्या दुकानांना फायदा मिळवून देण्यासाठी स्थानिक गरीब भूमिपुत्रांची फुटपाथवरील दुकाने स्थानिक आमदारांच्या पुढाकाराने नगर परिषदेने हटविली. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अतिक्रमण हटविणे क्रमप्राप्त असले तरी केवळ लहान फुटपाथधारकांना त्यांच्या व्यवसायापासून वंचित करणे हा अन्याय आहे. नगर परिषदेने प्रस्तावित सर्व्हिस रोडच्या जागेतील बड्या भांडवलदारांचे अतिक्रमण हटवून मर्दुमकी दाखवावी, पण ते केले जात नाही, असा आरोप जराते, शामसुंदर उराडे, जयश्री वेळदा या पदाधिकाऱ्यांनी केला.