गडचिरोलीत राष्ट्रीय बॅाल बॅडमिंटन स्पर्धेला सुरूवात, ३० राज्यांमधील संघ सहभागी

पुन्हा आरक्षण कोट्यात आणणार- ना.धर्मरावबाबा आत्राम

गडचिरोली : येथे पहिल्यांदाच वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅाल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेसाठी लडाखपासून तामिळनाडूपर्यंतच्या ३० राज्यांमधील पुरूष तर २६ राज्यातील महिलांचे संघ सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे राज्यात सरकारी नोकरीत खेळाडूंसाठी असलेल्या ५ टक्के आरक्षण कोट्यातून २०१४ मध्ये बॅाल बॅडमिंटन या खेळाला वगळण्यात आले. या खेळाला पुन्हा आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात होत असलेल्या या स्पर्धेचे आयोजन बॉल-बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोशिएशन व बॉल-बॅडमिंटन असोशिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मुंबई, लडाख ते तामिळपर्यंत सर्व प्रमुख राज्यांमधील पुरूष आणि महिला संघ सहभागी झाले आहेत. यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम, तसेच शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॅा.प्रशांत जाकी,  तर अतिथी म्हणून समाजकल्याम विभागाचे सहायक आयुक्त सचिन मडावी, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना.आत्राम यांनी हाती रॅकेट घेऊन बॅाल बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला. १० जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचा नागरीकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन दि महाराष्ट्र बॉल-बॅडमिंटन असोशिएशनचे महासचिव अतुल इंगळे, बॉल-बॉडमिंटन फेडरेशनच्या कार्यकारी समिती सदस्य प्रा.रुपाली पापडकर, शासकीय महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.सुरज येवतीकर, बॉल-बॅडमिंटन असोशिएशन गडचिरोलीचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, सचिव ऋषिकांत पापडकर यांनी केले आहे.