गडचिरोली : नक्षल चळवळीत काम करताना पोलिसांच्या गोळीने वेध घेतलेल्या किंवा अन्य कारणांनी मृत्यूमुखी पडलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांकडून सर्वत्र शहीद सप्ताह पाळला जातो. या कालावधीत हिंसक घटना घडवून आणण्यासोबत, मृत नक्षलवाद्यांच्या स्मृतित शहीद स्मारके बांधणे, यासोबत पत्रकबाजीतून नागरिकांना सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते. परंतू नक्षलवाद्यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता सर्वकाही सुरळीत राहावे यासाठी पोलीस यंत्रणेचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टिने हाय अलर्ट जारी करत पोलिस सर्वत्र करडी नजर ठेवून आहेत.
दरम्यान नागरिकांमधील नक्षल दहशत कमी करण्यासाठी पोलीस पथकाने गुरूवारी जहाल नक्षली बिटलू तिरसू मडावी याचे भामरागड तालुक्यातील विसामुंडी येथे नक्षलवाद्यांनी बनविलेले स्मारक तोडले. विशेष अभियान पथक व क्युआरटी पथकाने ही कारवाई केली.
नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर माओवादी कॅाम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभय याने एक पुस्तिका जारी करत नक्षल चळवळीतील काही नेत्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला आहे. नक्षल चळवळीसाठी देशात आतापर्यंत ४ हजार ५७७ जणांनी प्राण गमावले असून त्यात ८५६ महिला असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. दुसरीकडे पोलिसांनीही एक व्हिडीओ क्लिप जारी करत नक्षलवादी विकासाच्या विरोधात का आहेत? असा सवाल करत नागरिकांच्या विकासासाठी पोलीस आणि शासन कसे प्रयत्न करत आहेत याची माहिती त्यात दिली आहे.