गडचिरोली : पोलिसांच्या गोळीने रविवारी सायंकाळी ज्या तीन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले त्या तिघांचीही ओळख पटली असून त्यांच्यावर एकूण ३८ लाख रुपयांचे बक्षीस राज्य शासनाने ठेवले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या केडमारा जंगलात रविवारी संध्याकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यावेळी सी-६० कमांडोंनी नक्षलवाद्यांचा तळ उद्धवस्त करत तीन जहाल नक्षलवाद्यांचा वेध घेतला. त्यात ठार झालेल्या डीव्हीसी वासू याच्यावर १६ लाख रुपयांचे, कमांडर बिरसू मडावी याच्यावर १२ लाखांचे, तर डेप्युटी कमांडर श्रीकांत याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यानंतर गडचिरोलीच्या हद्दीतही नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरू झाल्याने पोलीस सतर्क झाले होते. या तीन जहाल नक्षलवाद्यांच्या ठार होण्यामुळे नक्षल चळवळीला आणखी एक हादरा बसला आहे.