गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (टप्पा 2) साठी जिल्हयाला 15 हजार 337 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी 10 हजार 425 घरकुलांना ऑनलाईन मंजुरी देण्यात आली. याशिवाय टप्पा 1 अंतर्गत पूर्णत्वास आलेल्या घरकुलांचे प्रतिनिधीक स्वरूपातील चावी वितरण आणि ई-गृहप्रवेश कार्यक्रम जिल्हा नियोजन भवनात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे दिल्लीतून थेट प्रसारण करण्यात आले.
खासदार डॅा.एन.डी. किरसान, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र भुयार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यातील घरकुलांची माहिती दिली. टप्पा-1 अंतर्गत 31 हजार 497 घरकुलांना मंजुरी मिळाली होती, त्यापैकी 29 हजार 918 घरकुले पूर्ण झाली असल्याचे आणि 1579 घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. टप्पा दोन अंतर्गत मंजुरी देण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
कार्यक्रमाला सर्व गटविकास अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, घरकुलांचे लाभार्थी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.