जीएसटीच्या नवीन कररचनेमुळे जीवनशैलीला चालना- आ.नरोटे

आजपासून मिळणार करात सूट

गडचिरोली : देशाच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या (जीएसटी) दराची पुनर्रचना करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आणला आहे. नवी कररचना आजपासून (दि.22) लागू होणार आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी पत्रकार परिषदेत्त व्यक्त केला.

केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेत केलेला बदल हा सर्वांत मोठी आणि लाभ मिळवून देणारी सुधारणा असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मागणी व उत्पादन वाढणार असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. ही आर्थिक संपन्नतेची सुरूवात असल्याचे आ.डॅा.नरोटे म्हणाले.

सध्याच्या चारस्तरीय कर रचनेचे सुसूत्रीकरण करून केवळ 18 टक्के आणि 5 टक्के अशा दोनच स्तरात नवी जीएसटी करआकारणी होणार आहे. त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा कमी किंवा नाहीसा होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास डॅा.नरोटे यांनी व्यक्त केला.

या पत्रपरिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, गीता हिंगे, डॅा.नितीन कोडवते, रमेश भुरसे, अनिल पोहनकर, अनिल कुनघाडकर आदी उपस्थित होते.