अहेरी : येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंकित यांची जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी वैभव वाघमारे (आयएएस) सोमवार दि. 24 जुलै रोजी रुजू झाले. मूळचे पंढरपूर येथील असणारे वाघमारे हे 2019 च्या बॅचचे आयएएस असून परिविक्षाधीन कालावधीत त्यांनी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे तहसीलदार व मुख्याधिकारी म्हणून सेवा दिली आहे.
2021 मध्ये मेळघाटच्या धारणी येथे आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी व उपजिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्या ठिकाणी महिला बचत गट व गावकऱ्यांच्या माध्यमातून वनोपज मालाचा योग्य वापर व्हावा म्हणून मोहफुलांची बँक तयार केली होती. त्यामुळे आदिवासी समाजाविषयी त्यांना विशेष कळवळा आहे. अहेरीचे प्रकल्प अधिकारी म्हणूनही प्रभार वैभव वाघमारे यांच्याकडे राहणार आहे. त्याचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांनाही होऊ शकेल.
विपश्यनेचा प्रभाव असणारे, बहुचर्चित व तरुणतुर्क वैभव वाघमारे अहेरीत रुजू होताच सामाजिक व विविध स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.