15 दिवसांपूर्वी मान्यता मिळालेल्या चातगाव पोलीस स्टेशनचे उद्घाटन

जिल्ह्यातील 35 वे पोलीस स्टेशन

धानोरा : राज्य शासनाच्या गृह विभागाने गेल्या 28 आॅक्टोबर रोजी शासन निर्णय काढून चातगाव पोलीस स्टेशनच्या निर्मितीला मान्यता दिली आणि अवघ्या 15 दिवसात या पोलीस स्टेशनचे शुक्रवारी (दि.14) पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले. या भागातील गुन्हेगारी आणि माओवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पोलीस स्टेशन महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय या भागातून चालणार्‍या सुगंधी तंबाखूच्या व्यवसायालाही आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे.

धानोरा तालुक्यातील पेंढरी, कॅम्प कारवाफा अंतर्गत चातगाव येथे 2010 पासून पोलीस मदत केंद्र कार्यरत आहे. मात्र या भागातील गुन्हेगारी, अवैध व्यवसाय आणि माओवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्याकरिता पोलीस स्टेशनला गृह विभागाने मान्यता दिली. सद्यस्थितीत चातगाव पोलीस स्टेशनअंतर्गत 26 गावे जोडली आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना तात्काळ मदत व सुरक्षा उपलब्ध होणार आहे. यातून या भागातील नागरिकांसोबत पोलिसांचा संवाद वाढून या भागात शांततेचे वातावरण निर्माण होईल.

या उद्घाटनप्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सुरक्षा गार्ड (मोर्चा), पोलीस अधिकारी व अंमलदारांचे बॅरेक, एसआरपीएफ अंमलदार बॅरेक इत्यादींना भेट देवुन पोलीस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकारी व अंमलदारांना मार्गदशन करताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, “पोलीस मदत केंद्राचे पोलीस स्टेशनमध्ये रुपांतर झाल्याने नागरिकांना मदत मिळणे, तक्रार नोंदविणे सोपे होणार आहे. सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीएनएस, ई-साक्ष व नवीन कायद्यांचा कौशल्याने वापर करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. तसेच नागरिकांसोबत सामंजस्यपूर्ण वागणूक ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करावे.”

या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी, कॅम्प कारवाफा जगदिश पांडे, चातगावचे प्रभारी अधिकारी पोउपनि चैतन्य काटकर व इतर अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.