‘माणुसकीचा घास’ उपक्रम, नगराध्यक्ष निंबोरकर यांची भेट

सलग 1084 व्या दिवशी अन्नदान

गडचिरोली : जिल्हा महिला रुग्णालय गडचिरोली येथे गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘माणुसकीचा घास’ या उपक्रमांतर्गत सलग 1084 व्या दिवशी अन्नदानाचा उपक्रम पार पडला. या उपक्रमाला नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी अचानक भेट देत आपल्या हस्ते गरजू नागरिकांना अन्न वितरण केले.

जिल्हा महिला सामान्य रुग्णालयासमोर गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक पदाधिकारी व स्वयंसेवकांच्या पुढाकारातून ‘माणुसकीचा घास’ हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरजू कुटुंबीयांना दररोज मोफत अन्न पुरवण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून केले जाते.

यावेळी बोलताना ‘माणुसकीचा घास’ उपक्रम राबविणाऱ्या सामाजिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असते. अशावेळी त्यांना किमान एक वेळचे अन्न मिळावे, हीच आमची भावना आहे. सलग 1084 दिवस हा उपक्रम अखंडपणे सुरू राहणे ही सामूहिक माणुसकीची ताकद आहे.”

नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “माणुसकीचा घास हा केवळ अन्नदानाचा उपक्रम नसून तो समाजातील संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे. अशा उपक्रमांना प्रशासन व लोकप्रतिनिधी म्हणून माझा सदैव पाठिंबा राहील.”

गरजू लोकांसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरत असून, मानवी मूल्ये जपणाऱ्या या कार्यामुळे उपस्थितांमध्ये समाधान व प्रेरणा निर्माण झाली.