गडचिरोली : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन 26 व 27 जानेवारी रोजी गडचिरोलीच्या संस्कृती सांस्कृतिक सभागृहात होणार आहे, अशी माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांनी दिली.
या अधिवेशनाचे उद्घाटन लॅायड्स मेटल्स स्टिल प्लान्ट कोनसरीचे निवासी संचालक ले.कर्नल (नि) विक्रम मेहता यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी खनिकर्म व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर राहतील. खासदार डॅा.नामदेव किरसान, ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील तीनही आमदार, माजी खासदार आणि अधिकारीगण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले.
याशिवाय गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, चामोर्शी बाजार समितीचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार, माजी न.प.सभापती विजय गोरडवार, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, सल्लागार शिवगोंड खोत हे उपस्थित राहणार आहेत.
रविवारी दुपारी 4 वाजता संघटनेच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता राज्य संघटनेच्या कार्यसमितीची बैठक, तर 6 वाजता राज्य संघटनेची सर्वसाधारण सभा होईल. रात्री 8 वाजता खुली चर्चा होणार असून त्यानंतर पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
राज्य संघटनेचे खुले अधिवेशन 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्याची घोषणा मागील सरकारने केली आहे. मंत्रिमंडळामध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे. हे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी मुख्य मागणी या अधिवेशनामध्ये असणार आहे.